पालघर- जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे भक्त या निर्णयाविरुद्ध एकवटले आहेत. आज (दि.22) मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील शिरासाडफाटा येथील मैदानात भक्तगणांच्या महामेळाव्यात धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा शांततेत पार पडला.
पालघर येथे बालयोगी सदानंद बाबा आश्रम बचावासाठी भक्तांचे धरणे
जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या विरोधात 22 ऑगस्ट रोजी मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील शिरासाडफाटा येथील मैदानात भक्तगणांच्या महा मेळाव्यात धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू असे सांगितले. या आंदोलनाला विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. गेली 48 वर्ष तुंगारेश्र्वर येथे बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे आश्रम आहे. येथे समाजोपयोगी वनौषधी उपचार करण्यात येतात. संस्कृतीचे जतन करण्यात येते पण या आश्रमाची बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय दिल्याचा भाविकांचा आरोप आहे. या आश्रमाला जागा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारने दिली होती,असेही भक्तांचे म्हणने आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या ऑक्टोबरपर्यंत आश्रम हटविण्यात यावे,असा आदेश दिला आहे.
भक्तांचा व जनभावनेचा आदर करुन केंद्र सरकारने याविषयावर लक्ष घालावे, असे या आंदोलनाचे निमंत्रक बळीराम चौधरी यांनी सांगितले. या धरणे आंदोलनाला पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देवून तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार नरेंद्र मेहता, काॅ.राजेंद्र परांजपे, कैलास पाटील, ज्योती ठाकरे आदींसह भक्तगण उपस्थित होते.