पालघर -सातपाटी येथे शिंपल्या पकडण्यासाठी गेलेल्या गरीब मच्छीमार महिला, मुले यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या पोलिसाला हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांची तडकाफडकी जिल्ह्याच्या कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आली आहे.
मच्छिमार महिला, मुलांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणे पोलिसाला भोवले - पालघर लेटेस्ट न्यूज
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी उपस्थित महिला व पुरुषांना खाडीच्या पाण्यातून बाहेर बोलावले आणि उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या घटनेची चित्रफित बनवून ती सर्वत्र प्रसारित झाल्याने या घटनेबाबत किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार बांधव, भगिनीमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून किनारपट्टीवर गावातील मच्छीमार व्यवसाय बंद आहे. लोकांच्या हाताला कुठलाही अन्य रोजगार नसल्याने खाडीतील शिंपले व अन्य मासे पकडून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिला व काही पुरुष मासे पकडण्यासाठी खाडीत जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तोंडावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न राखणे यांसारखे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी उपस्थित महिला व पुरुषांना खाडीच्या पाण्यातून बाहेर बोलावले आणि उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या घटनेची चित्रफित बनवून ती सर्वत्र प्रसारित झाल्याने या घटनेबाबत किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार बांधव, भगिनीमधून ही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
सातपाटी सरपंचासह सहकारी संस्था पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांनी सागरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जितेंद्र ठाकूर यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर उठाबशा काढण्याची शिक्षा देणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांची तडकाफडकी जिल्ह्याच्या कंट्रोलरूममध्ये बदली करण्यात आली आहे. या घटनेची चित्रफीत सर्वप्रथम सोशल मीडियावरून प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक करीत आहेत.