पालघर- डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कातकरी समाजासाठी विहीर व घरकुल योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेत 1 कोटी 65 लाख 45 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रमेश सवरा आणि मुलगा निलेश सवरा या दोघांना अटक केली आहे.
आदिवासी विकास प्रकल्पातील विहीर, घरकूल योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सवरा पिता-पुत्राला अटक - Police
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कातकरी समाजासाठी विहीर आणि घरकुलांची योजना राबवण्यात येते. या योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने सवरा पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे कार्यरत आहे. 2012 ते 2015 या तीन वर्षांच्या काळात कृषिरत्न कातकरी फळे-फुले भाजीपाला औषधी शेती संस्था नानिवली व कातकरी आदिम विकास संस्था नानिवली या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश सवरा यांनी कातकरी समाजासाठी राबविण्यात आलेल्या विहीर व घरकुल योजनेत घोटाळा केल्याचे उघडकीस आले. आदिवासी विकास प्रकल्पाने या संस्थेला विहीर व घरकुल योजना राबविण्यासाठी निधी दिला होता. मात्र प्रत्यक्षात या निधीचा फक्त कागदावर वापर झाला आणि योजना प्रत्यक्षात अंमलात आल्याच नाहीत.
सहा महिन्यांपूर्वी डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पी. पी. संखे यांनी याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 ते 2015 या काळात सवरा अध्यक्ष असलेल्या या दोन्ही संस्थांनी विश्वासघात करून घरकुल व विहिरींबाबत कामाची पूर्तता केल्याबाबत शासनाची फसवणूक कारण्याच्या उद्देशाने रमेश सवरा व मुलगा निलेश सवरा यांनी 1 कोटी 65 लाख 45 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांनाही अटक केली आहे.