पालघर -पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा व त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी पोलिसांची त्यांचा पसंतीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे.
दिवसरात्र आपले कर्तव्य बजवताना पोलिसांना अनेक सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबापासून दूर रहावे लागते. त्यामुळे ड्युटी सांभाळून आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देता यावा यासाठी पालघरमधील पोलिसांची घराजवळील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजे तिथे बदली..! पालघर पोलीस अधीक्षकांचा निर्णय
तब्बल 142 पोलिसांच्या बदल्या या त्यांच्या इच्छेनुसार करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जागा रिकाम्या नाही त्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना जवळच्या पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे.
निवडणुका बंदोबस्त, मंत्री- नेते यांचे संरक्षण, सण-उत्सव, आंदोलने-मोर्चे आदी सह गुन्ह्यांचा तपास, गुन्हे रोखणे आदी मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. अशावेळी आपले कर्तव्य बजावताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे पोलिसांवरील ताण दूर व्हावा आणि त्यांना आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलिसांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाले आहे.