पालघर- पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मते मिळाली. तर महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ५९६ इतकी मते मिळाली. त्यामुळे राजेंद्र गावित यांचा ८८ हजार ८८३ इतक्या मताधिक्याने विजय झाला. पालघर विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मोठे मताधिक्य तसेच नालासोपारा व बोईसर या बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना यश मिळाले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, वसई, नालासोपारा असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील डहाणू व विक्रमगड मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला किरकोळ बढत मिळाली. मात्र, पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेच्या राजेंद्र गवितांना येथून ५० हजाराहून अधिकचे मताधिक्य मिळाले.
वसई, नालासोपारा, बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून तेथे त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती या मतदारसंघात सुरुंग लावण्यात यशस्वी ठरले. या भागात राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यातील वसई वगळता बोईसर व नालासोपारा या दोन मतदार संघात बहुजन विकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. बोईसरमध्ये राजेंद्र गावित यांना १ लाख ४ हजार ३९२ तर बळीराम जाधव यांना ७६ हजार २२० इतकी मते पडली. येथे गावितांना २८ हजार १७२ मताधिक्य मिळाले. नालासोपारा मतदारसंघात गावित यांना १ लाख ३३ हजार २५९ मते तर जाधव यांना १ लाख ७ हजार ७२४ मते मिळाली. इथेही गावितांना २५ हजार ५३५ मताधिक्य मिळाले.
नालासोपारा, वसई भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असून त्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रचार सभाही नालासोपारा येथे झाली. येथील उत्तर भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून गावित यांना मतदान केले.