महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डहाणूत आयपीएल सामान्यावर सट्टा लावणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक - पालघर एलसीबी न्यूज

आयपीएल सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्येही एलसीबीने सट्टा लावल्याचे एक प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणी एकाला अटक केले आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.

betting
सट्टा

By

Published : Oct 8, 2020, 5:17 PM IST

पालघर - डहाणू येथे आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर दोन आरोपी फरार आहेत. डहाणू पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएल सामान्यावर सट्टा लावणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई

इंडियन प्रिमियर लीगचा 13वा हंगाम यंदा यूएईमध्ये खेळला जात असून ही जगातील सर्वात लोकप्रिय टी- 20 क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेतील सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. डहाणू येथे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीनुसार त्यांनी डहाणू येथील साईराज मेडिकलवर छापा टाकला. मेडिकलचा मालक जिनेश पूनमियाने 6 ऑक्टोबरला झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर सट्टा लावल्याचे उघड झाले.

पोलिसांनी जिनेश पुनमिया याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासून पाहिला असता, एका मोबाईल अ‌ॅपद्वारे सामन्यावर सट्टा लावल्याचे निष्पन्न झाले. जिनेश पूनमिया याने इरफान शेख नामक व्यक्तीकडून ATOZEXCH - ९ हे मोबाईल अ‌ॅप, त्याचा आयडी व पासवर्ड 1 लाख रुपये देऊन विकत घेतले. याचा अ‌ॅपचा वापर ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी हे अ‌ॅप तपासून पाहिले असता त्यामध्ये एकूण 1 लाख 25 हजार 574 रुपये जमा असल्याचे आढळून आले. मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर 60 हजार रुपये सट्टा लावल्याचे उघड झाले.

स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी जिनेश पूनमिया याला अटक केली असून इरफान शेख व त्याचा सहकारी शहाबाज फरार आहे. या तिघांविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details