पालघर-जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एव्हरेस्टवीर केतन सीताराम जाधव या विद्यार्थ्याचा आणि त्याच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. या व्यतिरिक्त पोलीस, कामगार आदी विभागांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी वनपट्टयांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत दोन अपत्यांनंतर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या मातांना 25 हजारांच्या मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. घरकुल योजनेअंतर्गत आदिम आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभांचे वाटप, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पॉवर टिलर, मत्स्यबीज, भाजीपाला बियाणे, सेंद्रीय शेती, जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने कर्ज वाटप प्रमाणपत्र, पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत गॅस जोडणीचे वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भातावरील खोडकिडीचे निर्मूलन कसे करावे याची माहिती देणाऱ्या पत्रिकेचे यावेळी अनावरण करण्यात आले.