पालघर -जिल्ह्यातील एडवण येथील भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला पालघर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच या गुन्ह्यात साथ देणाऱ्या मावशी आणि आजीला देखील १० वर्ष कैद आणि रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अरविंद महादेव पाटील (वय ४५ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शिकण्यासाठी आजी भानुबाई, मावशी मनीषा आणि काका अरविंद यांच्याकडे एडवण-डोंगरे येथे राहायला आली होती. त्यावेळी ती ५ व्या वर्गात शिकत होती. घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्या काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने २०१३ ते २०१४ च्या दरम्यान तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत होता. तिची मावशी व आजी यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी त्याला समजावले. मात्र, तरीही त्याने भाचीसोबत हे दुष्कृत्य सुरू ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिली. ६ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर काका, मावशी व आजी यांनी मुलीच्या आई-वडिलांना ही बाब न सांगता संगनमताने तिला विविध डॉक्टरांकडे उपचारार्थ फिरवत होते. यादरम्यान गरोदरपणाचे महिने पूर्ण होण्याच्या आधी ती प्रसूत झाली. त्यापासून तिला जन्मला आलेले बाळ शारीरिक कमकुवत असल्याने ते मृत पावले.