पालघर - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकासआघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या भारती कामडी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी निलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता; अध्यक्षपदी भारती कामडी, तर उपाध्यक्षपदावर निलेश सांबरेंची वर्णी पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी १५, भाजपा १०, माकप ६, बविआ ४, काँग्रेस १, अपक्ष ३ असे संख्याबळ होते. या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून भारती कामडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मनीषा बुधर आणि भारतीय जनता पक्षातर्फे सुरेखा थेतले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश सांबरे, बहुजन विकास आघाडीतर्फे विष्णू कडव आणि भाजपाकडून जयवंत डोंगरकर यांनी अर्ज दाखल केले होते.
हेही वाचा - न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी करा, युवकांची मागणी
पालघर जिल्हा परिषदेची ही निवडणूक तिरंगी झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीकडे ३४ सदस्यांचे संख्याबळ होते. दुपारी पार पडलेल्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीदरम्यान सर्व अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली. यात भाजपा आणि माकप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकासआघाडीच्या भारती कामडी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या माकपा, भाजपाच्या उमेदवारांनीदेखील अर्ज मागे घेतल्याने उपाध्यक्षपदी महाविकासआघाडीच्याच निलेश सांबरेंची बिनविरोध वर्णी लागली.