महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा : पालघर जिल्ह्यात मतदारांचा कौल कोणाला

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद झाले आहे. जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याचा निर्णय २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर समजणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

महाराष्ट्र विधानसभा : पालघर जिल्ह्यात मतदारांचा कौल कोणाला

By

Published : Oct 23, 2019, 3:58 PM IST

पालघर - बहुजन विकास आघाडीचे जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघात वर्चस्व आहे. यंदा जिल्ह्यात मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे येत्या २४ तारखेला समोर येणार आहे. पालघर जिल्ह्यात बविआ समोर प्रामुख्याने शिवसेनेचे आव्हान आहे. २१ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात जिल्ह्यात ५९.३२ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात सहापैकी तीन मतदारसंघात बविआचे वर्चस्व आहे. नालासोपाऱ्यात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून सगळ्या राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघ

डहाणू विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६६.१३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती.या निवडणुकीत डहाणू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पास्कल धनारे यांनी 44 हजार 849 एवढी मते घेत माकपच्या मंगत वानसा यांचा 16 हजार 700 मतांनी पराभव केला होता. वानसा यांना 28 हजार 149 मते मिळाली. यंदा या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा पास्कल धनारे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात माकपच्या विनोद निकोले यांचे आव्हान आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला असून यावेळी ६०.९६ टक्के इतके मतदान झाले असून घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागेल.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६७.१८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विष्णु सावरा यांनी 40 हजार 201 एवढी मते घेत शिवसेनाच्या प्रकाश निकम यांचा 3 हजार 845 मतांनी पराभव केला होता. निकम यांना 36 हजार 356 मते मिळाली होती. यंदा या मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार विष्णू सावरा यांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा आणि माकपच्या सुरेश भोईर यांचे आव्हान आहे. यावेळी या मतदारसंघात मतदानामध्ये एक टक्क्याची वाढ झाली असून ६८.८२ टक्के इतके मतदान झाले आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघ

पालघर विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६८.११ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनाच्या कृष्णा घोडा यांनी 46 हजार 142 एवढी मते घेत काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा 515 मतांनी पराभव केला होता. गावित यांना 45 हजार 627 मते मिळाली होती. यावेळी या मतदारसंघात ही जागा भाजप लढवत असून येथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या योगेश नम यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात यंदा २०१४ च्या तुलनेत फक्त ४७.११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

बोईसर विधानसभा मतदारसंघ

बोईसर विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६७.८६ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत बोईसर विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांनी 64 हजार 550 एवढी मते शिवसेनाच्या कमलाकर दळवी यांचा 12 हजार 873 मतांनी पराभव केला होता. दळवी यांना 51 हजार 677 मते मिळाली होती. या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेकडून विलास तरे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. यावेळी या मतदारसंघात ६८.०० टक्के मतदान झाले असून याठिकाणी कोण बाजी मारणार हे पहावे लागेल.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ५७.०० टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांनी 1 लाख 13 हजार 566 एवढी मते घेत भाजपच्या राजन नाईक यांचा 54 हजार 499 मतांनी पराभव केला होता. नाईक यांना 59 हजार 067 मते मिळाली होती. या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेने निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी या मतदारसंघात ५१.८२ टक्के इतके मतदान झाले आहे. विधानसभेच्या लक्षवेधी लढतीपैकी ही एक लढत असून संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.

वसई विधानसभा मतदारसंघ

वसई विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६५.५७ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या विधानसभा निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या हिंतेद्र ठाकूर यांनी 97 हजार 291 एवढी मते अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांचा 31 हजार 896 मतांनी पराभव केला होता.पंडीत यांना 65 हजार 395 मते मिळाली होती. या मतदारसंघातून यंदा बहुजन विकास आघाडीच्या अॅंटन डिकुन्हा यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या विजय पाटील यांचे आव्हान आहे. यावेळी या मतदारसंघात ६२.४५ टक्के इतके मतदान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details