विरार (पालघर) - विरार पूर्व नारंगी खाडी येथे बोटीवर वाढदिवसाची पार्टी साजरी करताना, सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटून एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
अर्नाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथे राहणारे शशिकांत गोविंद गुरव (५४) हे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १० ते १२ मित्रांसह विरार पूर्व नारंगी खाडी परिसरात रविवारी इतर मित्रांबरोबर गेले होते. रेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या नांगरलेल्या बोटीवर त्यांची ही पार्टी सुरू होती. दरम्यान पार्टी सुरू असताना सेल्फी काढण्यासाठी गुरव आणि त्यांचे मित्र बोटीच्या एका दिशेला गेले असता, बोट अचानक उलटली. या गुरव व त्यांचे मित्र पाण्यात पडले. परंतु गुरव यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडओरड केली, तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्यात एका डॉक्टर मित्राने त्याच्या पोटातील पाणी काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून गुरव यांना मृत घोषित केले. या संदर्भात अधिक माहिती देताना अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी माहिती दिली की, हे मित्र नांगरलेल्या बोटीत बसले होते. त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या संदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा-सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, दोन जण जखमी