पालघर -भाजपा समर्थित आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारद्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आदी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांना मैदानात उतरविले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्यामुळे उद्धव ठाकरे हे आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
काय आहे पत्रात ? :दिवंगत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार तथा पहिल्या मराठी भाषिक प्रतिभा पाटील तसेच प्रणय मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता आणि दोघेही देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. या गोष्टीचे स्मरण करून आपण आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन आदिवासी समाजाचा सन्मान करावा, त्या देशाच्या आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास देशातील तमाम आदिवासी समाज आपला ऋणी राहील, अशा विनंतीचे पत्र खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.