पालघर/वसई - वसई पश्चिमेतील झेंडा बाजार येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून चोरी करून चोर फरार झाला होता. अवघ्या २४ तासाच्या आतच या मोबाईल चोरट्याच्या मुसक्या वसई पोलिसांनी आवळल्या आहेत.
हेही वाचा -रिया चक्रवर्ती एका महिन्यानंतर तुरुंगाबाहेर, हायकोर्टाकडून जामीन मंजूर
वसई पश्चिमेतील परिसरात झेंडा बाजार परिसर आहे. या परिसरात असलेल्या मोबाईलचे दुकान फोडून त्यातून आयफोन, जिओ, विवो अशा विविध प्रकारचे १० मोबाईल, २० एअरफोन, १५ चार्जर, २० ब्लुटूथ व रोख रक्कम असा १ लाख ६३ हजारा रुपये किंमतीचा माल चोरीस गेला होता. याबाबत मालकाने वसई पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली होती.
यावरून वसई पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असता, अवघ्या २४ तासाच्या आतच कोळीवाडा येथून या आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे.