पालघर (वाडा) -सरकारने स्मारके बांधण्यापेक्षा जर दवाखान्यांची स्मारके बनवली तर या देशातील गरिबी दूर होईल, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केले. ते शुक्रवारी विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
पालघरच्या विकासावरून बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे गणपतीप्रमाणे विसर्जन केले पाहिजे - बच्चू कडू
मुंबईपासून पालघर १०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरीही या जिल्ह्यात रस्ते, वीज आणि पाणी नाही. मग असला मुख्यमंत्री काय कामाचा, असे म्हणत बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली.
विक्रमगड मधील झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा आरोग्य आणि निसर्गाचा महायज्ञ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या. तसेच अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित गोरगरिब लोकांना विविध आजारावरील आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या.
मुंबईपासून पालघर १०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरीही या जिल्ह्यात रस्ते, वीज, आणि पाणी नाही. मग असला मुख्यमंत्री काय कामाचा असे म्हणत त्यांनी गणेशाचे विसर्जन करतात तसे मुख्यमंत्र्याचे विसर्जन केले पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यावर टीका केली. थापा देवून चालत नाही, कृती महत्वाची आहे. असे म्हणत त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संस्थेचे निलेश सांबरे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.