विरार (पालघर) :विरार येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने आपले अपहरण झाल्याची व्हाईस नोट कुटुंबीयांना पाठवल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी कुटुंबाने अर्नाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला. मात्र पोलीस तपासा दरम्यान तिचे अपहरण झालेले नसून, तिने अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आता अर्नाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुलीने अपहरण झाल्याची व्हाईस नोट पाठवली : ही अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे कामावर जाते असे सांगून घरातून गेली होती. मात्र ती कामावर गेलीच नाही. मुलगी रात्री उशीर झाला तरीही घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर या तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईलवर व्हाट्सॲपद्वारे रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास एक व्हॉइस नोट पाठवली. माझे एका व्यक्तीने अपहरण केले असून तो ट्रेन मधून मला अज्ञात स्थळी घेऊन जात असल्याचे तिने या व्हॉइस नोटमध्ये सांगितले. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.