पालघर (वाडा) - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजपचे सत्ताकेंद्राचे बळ कमी झाले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सत्तेचेबळ वाढलेले पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित युतीने लढत आहेत. असे असले तरी या सत्ताकेंद्र बळाच्या जोरावर आगामी विधानसभा जागा वाटपात भाजपपेक्षा शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये आघाडीवर राहणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.
दिवंगत माधवराव काने यांच्या शिष्यापैंकी एक असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या यशात जुन्या जवळच्या सहकारी निष्ठावान कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. पुढे विधानसभा पुनर्रचनेनंतर भिवंडी व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केले. सन १९९५-९६ च्या युती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री पद सांभाळले. याच काळात जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन नव्या विक्रमगड तालुक्याची निर्मिती केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे होते.
यानंतर त्यांना दुसऱ्यांदा महायुतीच्या सरकारात आदिवासी विकासमंत्री पद दिर्घकाळ मिळाले. मंत्री पद मिळताच त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी असलेला पेसा कायदा संमत केला. हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जातो. अनेक निर्णय घेत असताना आदिवासी मुलांना उत्तम दर्जाच्या इंग्रजी शाळेत शिकविण्यासाठी विविध ठिकाणी त्यांनी मुलांना प्रवेश देऊ केला. तर या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने उचलली. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला.