पालघर- सफाळे ग्रामपंचायत हद्दीतील मालकरीपाडा रोहित्रापासून वंचित आहे. तर असलेल्या रोहित्रावर अतिरिक्त वीज दाबामुळे त्यात बिघाड होऊन परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
पालघरमधील सफाळे ग्रामपंचायत हद्दीतील मालकरीपाडा रोहित्रापासून वंचित
सफाळे ग्रामपंचायत हद्दीतील मालकरीपाडा रोहित्रापासून वंचित आहे. तर असलेल्या रोहित्रावर अतिरिक्त वीज दाबामुळे त्यात बिघाड होऊन परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
मालकरीपाडा येथील नागरिकांना वीज पुरवठ्यासाठी अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील जुने रोहित्र अत्यंत बिकट अवस्थेचा असून तो कसाबसा खांबांवर आधार देऊन लटकवण्यात आला आहे. तो कधीही पडून एखादी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच हा रोहित्र रस्त्याच्या लगत असून त्यावर वारंवार घर्षण होऊन ठिणग्या पडत असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ते धोक्याचे आहे. रोहित्र १०० किलोव्हॅटचे असून त्यावर अधिकचा वीजभार दिला जात असल्यामुळे ते लोड घेत नाही. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. परिणामी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.
नवीन रोहित्र बसवून देण्याची मागणी याआधीही मालकरीपाडा येथील नागरिकांनी महावितरणाकडे लेखी केली. मात्र, त्यानंतरही महावितरणने या जागी नवीन रोहित्र बसवून दिले नाही. तसेच जुने रोहित्रही व्यवस्थित रित्या ठेवला नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा मोठा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात कमी व उच्चदाब होत राहतो. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी नवीन रोहित्र बसवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.