पालघर : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात एका चिमुकलीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर म्हसेपाडा नावाचे गाव आहे. हे गाव गारगाई व पिंजाल नदी बेटावर आहे. बुधवारी पहाटे येथील एका 42 दिवसाच्या मुलीची तब्बेत अचानक बिघडली. मात्र पावसामुळे गावात जायला रस्ता नसल्याने या मुलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गावकरी आता प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत.
उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला : लावण्या नरेश चव्हाण (वय 42 दिवस) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवरील म्हसेपाडा गावाची लोकसंख्या केवळ 150 ते 200 च्या आसपास आहे. वाडा येथे ग्रामीण रुग्णालय असून विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे दोन्ही म्हसेपाड्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. मृतक लावण्याला मंगळवारी रात्री ताप आला होता. आधी तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर घरगुती उपचार केले. मात्र त्यानंतर तिला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर बुधवारी पहाटे तिला मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.