पालघर - त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत 'मी पालघरकर' समूहातर्फे मंगळवारी संध्याकाळी शहरातील श्री गणेश कुंड तलाव परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण गणेशकुंड न्हाऊन निघाला. तसेच, यावेळी आतिषबाजी देखील करण्यात आली. हा अदभुत नयनरम्य आणि विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण पालघरकरांनी एकच गर्दी केली. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमेच्या) या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, असूर शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून ठिकठिकाणी या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो.
पालघरातील गणेश कुंड येथे दीपोत्सवानिमित्त आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी
पालघर शहरात असलेले गणेशकुंड हे फक्त गणेश विसर्जनासाठी नसून सामाजिक सलोखा कायम राहावा, तसेच सर्वांनी एकत्रित येत सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. या निमित्ताने हा दीपोत्सव प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांची नवीन ओळख 'महाराष्ट्र सेवक', CMO वर मात्र तोच फोटो
हा दीपोत्सव कार्यक्रम वात्सल्य जेष्ठ नागरिक संघ, पालघर प्रतिष्टान, यंग स्टार ट्रस्ट पालघर, संस्कार भारती पालघर, सोनोपंत दांडेकर कला क्रीडा अकादमी, दुर्गाना महिला मंडळ, राधा कृष्ण भागवत पालघर, मंगला महिला मंडळ, ओमकार महिला मंडळ, गुजराती सेवा मंडळ, जैन युवा ग्रुप, स्नेह संवर्धन महिला मंडळ, तनिष्का ग्रुप ऑफ पालघर, बालमित्र गणेशोत्सव मंडळ शुक्ला कंपाऊंड, आश्रम ग्रुप महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रतिसादात पार पडला.