पालघर - विरारमधील विष्णू वामन ठाकूर ट्रस्टने 'वि.वा. महाविद्यालया'च्या दोन इमारतींसह शिरगाव येथील संस्थेच्या महाविद्यालयाची इमारत, कोरोनो विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी विनामुल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाच्या प्रभावी उपाययोजना आणि उपचारासाठी संस्थेच्या या मालमत्ता ताब्यात घेण्यासंबंधीचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
आमदार हितेंद्र ठाकूरांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र... हेही वाचा...Corona: टाटा समूहाने कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसाठी ताज हॉटेल्स केले खुले
लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असून ट्रस्ट संचलित विरारमधील वि.वा. कॉलेज (दोन इमारती व जागा) आणि शिरगावमधील महाविद्यालयाच्या इमारती या सर्व रिकाम्या आहेत. यासाठी ट्रस्टने या तिन्ही इमारती आणि विद्यानगरीचा परिसर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तसेच विविध सेवा सुविधा पुरवण्यांसाठी विनामूल्य दिला आहे.
जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अशा काही संस्था आणि समाजातील दानशूर लोक यांनी एकत्र येत जवळपास १५ हजार लोकांच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केल्यास तेथील रुग्णालय कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाखाण्याची सोय देखील विनामूल्य केली जाईल, असेही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे. यामुळे वसई-विरार शहरातील रुग्णांचे व्यवस्थापन करणे सहज शक्य होणार आहे.