महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये कुपोषण निर्मुलनासाठी पथदर्शी योजनेचा शुभारंभ - tribes in palghar

सबंध देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे कुपोषण निर्मूलनासाठी 2 किलो तुरडाळ व 1 किलो खाद्य तेलाच्या वाटपाची अशाप्रकारची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांतील 40,192 आदिवासी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पथदर्शी योजना

By

Published : Sep 20, 2019, 12:07 PM IST

पालघर- जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात कुपोषण निर्मुलन करण्यासाठी पथदर्शी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आदिवासी कुटुंबांना कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येकी 2 किलो तुरडाळ व 1 किलो खाद्य तेल मोफत देण्यात येणार आहे. यासाठीच्या पथदर्शी योजनेचा आज राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

आदिवासी नागरिकांसाठीच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ करताना आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित


सबंध देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे कुपोषण निर्मूलनासाठी 2 किलो तुरडाळ व 1 किलो खाद्य तेलाच्या वाटपाची अशाप्रकारची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांतील 40,192 आदिवासी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाला 6 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे 6 महिन्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास संपूर्ण राज्यभर ही योजना राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा-आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्षांनी केली दापरी दुग्ध प्रकल्पाची पाहणी

अंगणवाडी केद्रांच्या माध्यमातून मुलांना, गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना घरी शिजवून खाण्यासाठी कडधान्य दिले जाते. मात्र, कुटुंबातील सर्वच सदस्य ते कडधान्य खातात, कारण संपूर्ण कुटुंबच कुपोषीत असते त्यामुळे त्याचा लाभ होत नाही. येथील आदिवासी नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे पोषण व्हावे, (पुरेसे प्रोटीन व कार्बोहाइड्रेट मिळावे) त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी या योजनेद्वारे मोफत डाळ व खाद्य तेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण देशातल्या नागरिकांचे सरासरी आयुष्य 65 वर्षे असताना आदिवासींचे आयुष्य 50 वर्ष इतके कमी झाल्याचे सांगून पंडित यांनी चिंता व्यक्त केली. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराने तुरडाळ किंवा खाद्य तेल काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंडित यांनी दिले आहेत.

जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजित या कार्यक्रमास विवेक पंडित यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संजय अहिरे, जव्हार व मोखाडा येथील तहसिलदार व पुरवठा अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमंत सावरा तसेच इतर अधिकारी व मान्यवरांसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details