पालघर- कामाचे वेतन मिळण्यासाठी जिल्ह्यातील कुडूस येथे शीतपेय बनवणाऱ्या कोका-कोला कंपनीच्या गेटजवळ कामगार जमा झाले आहेत. तर कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन कंपनी व्यवस्थापन यांच्यात अद्याप चर्चा सुरू आहे. यानंतरच कंपनीची कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांविषयी भूमिका स्पष्ट होईल.
कोका-कोला कंपनीच्या गेटवर कामगार जमा; वेतनाची मागणी - पालघर मजूर
वेतन मिळण्यासाठी कुडूस येथे शीतपेय बनवणाऱ्या कोका-कोला कंपनीच्या गेटजवळ कामगार जमा झाले आहेत. तर कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन कंपनी व्यवस्थापन यांच्यात अद्याप चर्चा सुरू आहे. यानंतरच कंपनीची कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांविषयी भूमिका स्पष्ट होईल.
वाडा तालुक्यातील कुडूस येथे शीतपेय बनवणारी मल्टी नॅशनल कोका-कोला कंपनी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगार कार्यरत आहेत. याचसोबत तालुक्यात स्टील रोलिंग मिल, केमिकल तसेच अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. महामारीमुळे लॉकडाऊनची घोषणा झाली; आणि या कंपनीतील अनेक कामगार घरी बसले. यानंतर कंपनीचे उत्पादन काही अटींवर चालू ठेवण्यात आले. यावेळी कंपनीत हेल्पर पदावर जवळपास 300 हून अधिक कंत्राटी कामगारांनी काम केले. त्यांचा अद्याप पगार झाला नसल्याने मागील दोन दिवसांपासून हे कामगार कंपनीच्या गेटजवळ जमा होत आहेत.
तर कंपनी या कामगारांना 80 टक्के पगार देत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. तसेच अद्याप अनेक कामगार संचारबंदीमुळे घरातच अडकले आहेत. अशा कामगारांना कुटूंब खर्च काढणे कठीण झाल्याने त्यांची पगार कपात होऊ नये, अशी मागणी कामगार नेते करत आहेत. तर यावर स्थानिक कामगार संघ युनियनचे कामगार प्रतिनिधी महेंद्र गायकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी युनियन मध्ये 330 कामगार काम करत असल्याची माहिती दिली. कंपनीकडून या सगळ्या कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार मिळाला पाहिजे, असे म्हणाले. तसेच लॉकडाऊनच्या काळात घरी अडकलेल्या कामगारांना देखील दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय.
या प्रकरणाबाबत कंपनीतर्फे कोणीही अधिकृतरित्या बोलायला तयार नसल्याने कंपनीची बाजू अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कामगार नेते, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती कंपनीतील एका कर्मचाऱ्याने नाव व छापण्याच्या अटीवर दिलीय.