महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये खैर तस्करीच्या घटनांमध्ये वाढ; आर्थिक लोभापायी वन विभागाचे दुर्लक्ष?

संरक्षित वनातून तसेच वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या वाहनांमधून राजरोसपणे सागवान, खैर अशा मौल्यवान झाडांची कत्तल होऊन त्याची तस्करी होत आहे. या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. असे असेल तर येत्या काही काळात ही मौल्यवान झाडे नामशेष होतील व त्यांचे महत्त्व नष्ट होईल. त्यामुळे वनविभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात ठेवून आपली यंत्रणा सजग व सुदृढ करावी आणि तस्करांच्या घटनांना वेळीच थांबवाव्यात. याचबरोबरीने पर्यावरणाची होत असलेली हानीही थांबवावी, अशी मागणी होत आहे.

पालघरमध्ये खैर तस्करीत वाढ

By

Published : May 9, 2019, 12:21 PM IST

पालघर- बहिरी फोंडा हद्दीतील जंगलात खैर तस्करांनी खैराच्या ओंडक्याने भरलेल्या टेम्पोला आग लावून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. जंगलातील खैर वृक्ष तोडून त्याची तस्करी करीत असताना तस्करांचा टेम्पो दगडात रुतून बसला होता. अनेक प्रयत्न करूनही खैराच्या लाकडांनी भरलेला तो टेम्पो बाहेर निघाला नाही. त्यामुळे आपण पकडले जाऊ नये, या भीतीने तस्करांनी तो टेम्पो पेटवून दिला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, खैर जातीच्या लाकडांची चोरी आणि तस्करीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

पालघरमध्ये खैर तस्करीत वाढ

अलीकडेच सातीवली आणि बहिरी फोंडा, पाचा मोहो भागातील जंगलातून खैर तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दहिसर वन परिक्षेत्र हद्दीतील सातीवली गावाच्या हद्दीतील जंगलात काही खैरांच्या झाडांची अनधिकृतपणे तस्करी होणार असल्याची माहिती येथील वन कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खैराचे ओंडके जप्त केले व दहिसर येथील वखरीत ठेवले. मात्र, या कारवाईत खैर तस्कर वनविभागाच्या हाती लागले नाहीत.

वांद्री धरण परिसरातील बहिरी फोंडा ठाकूर पाडा हद्दीतील जंगलातही तस्करांकडून खैराची तस्करी सुरू होती. मात्र, यावेळी खैर वाहुन नेणारा टेम्पो दगडात रूतून बसला. त्यामुळे तो बाहेर निघत नसल्याने खैर तस्करांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खैराच्या ओंडक्यासह टेम्पोला आग लावली. अशाप्रकारे या परिसरात खैर या झाडांची तस्करी होत असताना वन विभागाचे गस्ती पथक किंवा निवासी कर्मचारी अशा तस्करांना आळा का घालत नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. काहींच्या मते या लाकडाच्या तस्करीत वन विभागाचेच काही कर्मचारी आर्थिक लोभापायी सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

खैराची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या खैरचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थात तसेच खाण्याच्या पानांमध्ये कात म्हणून वापर केला जातो. त्याचप्रमाणे याचे इतरही उपयोग आहेत. त्यामुळे खैराला मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये मागणी आहे. खुल्या बाजारात अधिकृत खैर हा खूप महागडा पडत असल्यामुळे तस्करी केलेला खैर त्याला पर्याय म्हणून विकत घेतात.

डहाणू वनसंरक्षक यांच्याअंतर्गत येत असलेल्या १० वनपरिक्षेत्रात हजारो हेक्टर वनजमीन आहे. यात वनसंपदा क्षेत्र म्हणूनही काही भाग राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सागवान, खैर आदी मौल्यवान झाडांचा समावेश आहे. ही झाडे रात्रीच्या वेळी तोडून त्याची अनधिकृतरित्या कत्तल करून तस्करी केली जाते. असे असताना जंगलातून मौल्यवान खैर आदी लाकडाच्या तस्करीवर आळा घालण्यास वनविभागाला अपयश आले आहे, असे चित्र दिसत आहे. संरक्षित असलेल्या किंवा ठेवलेल्या अशा वनांवर वनविभागाने करडी नजर ठेवणे आवश्यक आहे. मात्र, लाकूड तस्कर अशाप्रकारे तस्करी करून ही वने नष्ट करीत असतील तर पर्यावरणाला याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वनविभागाने कठोर अंमलबजावणी करायला हवी, अशी मागणी होत आहे.

राजरोसपणे संरक्षित वनातून तसेच वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या वाहनांमधून अशी मौल्यवान झाडांची कत्तल होऊन ती तस्करी होत आहे. असे असेल तर येत्या काही काळात ही मौल्यवान झाडे नामशेष होतील व त्यांचे महत्त्व नष्ट होईल. त्यामुळे आतातरी वनविभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात ठेवून आपली यंत्रणा सजग व सुदृढ करावी आणि अशा तस्करांच्या घटनांना वेळीच थांबवाव्यात. याचबरोबरीने पर्यावरणाची होत असलेली हानीही थांबवावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details