पालघर/वसई - वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवजीवन नाका परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा ओढणीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रयत्न त्या तरुणीच्या, आई-वडील आणि अल्पवयीन भावानेच केला. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तरुणीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होते. यामुळे त्यांनी हे कृत्य केले.
पीडित तरुणीचे परिसरात राहणाऱ्या एका मुलावर प्रेम होते. ते दोघे फिरण्यासाठी गेले असता, तरुणीच्या भावाच्या मित्राने त्यांना पाहिलं. त्याने ही बाब भावाला सांगितली. तेव्हा भावाने हा प्रकार घरी सांगत तरुणीला त्या मुलापासून दूर राहण्यास सांगितले. पण तरुणी समजावून देखील ऐकत नव्हती.
आई-वडील आणि भावाने रचला कट
या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या आई-वडील आणि भावाने तरुणीचा खून करण्याचा कट रचला. तिघांनी तरुणीला सुरूच्या बागेत फिरण्यासाठी नेले. तिथे झुडपात त्या तरुणीचा ओढणीने गळा आवळला. तरुणी बेशुद्ध झाली. तेव्हा तिचा जीव गेल्याचे वाटल्याने, तिघे तिथून पसार झाले.