विरार (पालघर) - विरारच्या विवा कॉलेजच्या प्राचार्य (VIVA College Principal) पदावर असलेल्या एका मुस्लीम महिलेने हिजाब वादातून (Hijab Controversy) राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. बत्तुल हामीद असे या महिला प्राचार्याचे नाव आहे. त्या २०१९ पासून विवा कॉलेजच्या विधी विभागाच्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. मात्र, राजीनामा पत्रात हिजाबचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कर्नाटकातून सुरू झालेला हिजाबचा वाद आता अनेक राज्यांमध्ये पेटला आहे.
राजीनामा पत्रात हिजाबचा उल्लेख नाही :काही दिवसांपासून कॉलेजमधील असुरक्षित वातावरणाला हामीद या त्रासल्या होत्या. या कारणामुळे नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मेलद्वारे कॉलेज व्यवस्थापनाला दिला आहे. या मेलमध्ये हिजाब परिधान केल्यामुळे राजीनामा देत असल्याचा कोणताही उल्लेख नाही. याबाबत हामीद यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही महाविद्यालय व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता, त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
हेही वाचा -Couple ran away from jammu kashmir: जम्मू - काश्मीर येथून पळून आलेल्या प्रेमी युगुलाला पालघर येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
काय लिहिले आहे पत्रात : विवा लॉ कालेजचे प्राचार्य म्हणून 19 जुले 2019 पासून काम सुरू केले, तेव्हापासून माझ्या कामाचे व्यवस्थापन समिती, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. मात्र, काही दिवसांपासून माझ्या सभोवतालचे वातावरण असुसंवादी केले जात असल्याने मला अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे, प्राचार्य म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे कठीण आहे. त्यामुळे, मी माझा राजीनामा देत आहे, यापुढे मला हे पद सांभाळणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही या पदासाठी दुसऱया व्यक्तीची व्यवस्था करा, मला या संस्थेत चांगले काम करता आले. या संस्थेच्या माध्यमातून मी अनेक ज्यष्ठ न्यायमूर्तींसोबत सेमिनार घेतले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले. एलएलबी, बीएएलएलबी, एलएलएम या कोर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवता आले, असे बत्तुल हामीद यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. मात्र, हिजाबचा या पत्रात उल्लेख दिसून येत नाही. पण हिजाबच्या विषयावरूनच हा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे चुकीचे : कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या वादावर 15 मार्चला निर्णय दिला आहे. हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही, असे न्यायालयाने सांगितले आणि मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळली होती. यानंतर मात्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेली बंदीही न्यायालयाने कायम ठेवली आहे.
कर्नाटकातून हिजाबचा वाद देशभरात पेटला : कर्नाटक राज्यातील एका कॉलेजात ड्रेसकोडचा वाद पेटला होता. कॉलेजमध्ये गणवेश बंधनकार केल्यानंतरही मुस्लिम तरुणी हिजाब घालून येत होत्या. याला काही हिंदु विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवत गळ्यात भगवा रुमाल घातला होता. या आंदोलकांना हिजाब घालून जाणारी एक तरूणी भिडली होती. तिचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला होता. त्यानंतर हिजाबचा वाद देशभरात पसरला होता.
हेही वाचा -नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक