नालासोपारा (पालघर) - नालासोपारा पाश्चिमेच्या साक्षी ज्वेलर्सवर शनिवारी सकाळी ११च्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यात दुकान मालक किशोर जैन यांची हत्या करून सोन्या चांदीचा लाखोंचा ऐवज लुटून नेला आहे. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हत्याकरून लाखोंचे दागिने घेऊन हल्लेखोर पसार -
नालासोपारा पाश्चिम एसटी डेपो मार्गावर साक्षी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी 10:40च्या दरम्यान दुकानाचे मालक किशोर जैन यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. सकाळची वेळ असल्याने दुकानात ते एकटेच होते. ही संधी साधत जैन दुकानात पूजा करत असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानात जाऊन जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र, जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. यामुळे हल्लेखोरांनी जैन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. या हल्ल्यात जखमी जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर जवळपास एक ते दीड तासानंतर ही घटना आजूबाजूच्या दुकानदारांना समजली. दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येचा या घटनेने ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.