पालघर -बर्ड फ्लूनंतर अचानकपणे 19 बकऱ्यांच्या अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वेवुर परिसरातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून उघड्यावर सोडण्यात येणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी पिल्याने या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रासायनिक सांडपाणी पिल्याने बकऱ्यांचा मृत्यू -
पालघर पूर्वेकडील गणेशनगर परिसरातील वेवूर औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. येथील कारखान्यांतून राजरोसपणे उघड्यावर तसेच नैसर्गिक पाणीच्या स्रोतात प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता त्याचप्रमाणे उघड्यावरदेखील सोडण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. याठिकाणी असलेल्या एका केमिकल कंपनीतून असेच प्रदूषित रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी पिऊन 19 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार पालघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष : नंदुरबारच्या दुर्गम भागात होडीतून प्रवास करून 'ती' पोहचवते पोषण आहार