पालघर :आदिवासी ग्रामीण भागात मुलींमध्ये लैंगिक शिक्षणाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे मासिक पाळी विषयी त्यांच्या मनात न्यूनगंड तयार झाला आहे. शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांनींची मासिक पाळी काळात मोठी अडचण होत (Girl Students Absence during menstruation ) आहे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी सक्तीची सुट्टी घ्यावी लागते आहे. या बाबींचा विचार करून मोखाड्यातील कोचाळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि मुंबई च्या लक्ष फाऊंडेशनच्या मदतीने, विद्यार्थीनींना त्या काळासाठी हॅप्पी गर्ल संकल्पना राबवत स्वतंत्र खोलीची निर्मिती केली ( Happy Girl Rest Room ) आहे. या खोलीत दोन पलंग, गादी, सॅनेटरी पॅड, वेंडींग मशीन आणि पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशीन ठेवली आहे. त्यामुळे त्या काळात ही विद्यार्थीनी शिक्षण घेत खेळू, बागडू लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यात असा ऊपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे.
मासिक पाळीत गैरहजेरीचे प्रमाण वाढले : मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोचाळे शाळेत 1 ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण 129 मुले मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये 24 किशोर वयीन मुली आहेत. मासिक पाळीच्या काळात पालकांचे अज्ञान, सुविधांची कमतरता यामुळे मुलींचे गैरहजेरीचे प्रमाण वाढले. येथील प्रयोगशिल मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी शाळेत उपलब्ध जागेत मुलींसाठी रेस्ट रूम बनवण्याची संकल्पना शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांसमोर मांडली. या कामी पालक, ग्रामस्थ यांनी श्रमदान करण्याचे आश्वासन दिले. तर आर्यन दळवी आणि मुंबईच्या लक्ष फाउंडेशनच्या जोत्सना कांबळे यांनी रूमसाठी आवश्यक साहित्ये पुरविण्याचे आश्वासन दिले.