पालघर Forest Labourers Movement : पालघर जिल्ह्यातील जव्हार व डहाणू वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागात काम करणारे मजूर अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं करत आहेत. मात्र, त्यांना वनखात्याकडून आश्वासना पलीकडं काहीच भेटलं नाही. वनखातं त्यांची फसवणूक करत असून वनखात्याच्या कथित जाचाला कंटाळून आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गांधी जयंतीच्या दिवशी जिल्ह्यात कुठल्याही एका प्लांटवर वनमजूरांनी 'सामूहिक आत्महत्या' आंदोलनाचा निर्णय घेतलाय.
वनमजूरांकडं दुर्लक्ष :डहाणू वनविभाग, जव्हार वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनमजूर गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या विविध मागण्या घेऊन सरकार दरबारी न्याय मागत आहेत. या मागण्यांसाठी बैठका झाल्या लाँग मार्च झाले तरीही वन अधिकारी वन मंजुरांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वनमजुरांनी केलाय. अनेक महिन्यांपासून पगार मिळत नाही. त्यामुळं कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा चालवायचा हा मोठा प्रश्न या वनमजुरापुढे उभा राहिलाय. पगार मिळत नसल्यामुळं महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलांवर त्याचा परिणाम होतोय. मजुरांना कायमस्वरूपी काम मिळत नाही, नवीन प्लांटेशन न घेतल्यानं अनेक मजुरांना घरी बसावं लागलंय. त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढं 'आ' वसून उभा राहिलाय, असंही आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी सांगितलंय.
सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय : अधिकारी वर्ग तुपाशी, जंगलाचं रक्षण करणारे वनमजुर मात्र उपाशी, अशी गत वनमजुरांची होऊन बसली आहे. वनविभाग या वनमजुरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना वनमजुरांची झालीय. यामुळं आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील कुठल्याही एका प्लांटेशनमध्ये सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून अशा आशयाचं पत्रही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.