पालघर -डहाणू तालुक्यातील घोलवड येथील प्रसिद्ध असलेल्या चिकूला जीआय मानांकन प्राप्त झाले असून त्यामुळे जीआय प्रमाणित उत्पादनांच्या निर्यातीला आता मोठा वाव मिळाला आहे. प्रसिद्ध घोलवड चिकू आता निर्यात होऊन सातासमुद्रापार युनायटेड किंग्डम येथे पोहोचला आहे.
घोलवडचा प्रसिद्ध चिकू पोहोचला सातासमुद्रापार 147 चिकू उत्पादक शेतकरी अधिकृत जीआय वापरकर्ते-
पालघर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर जमीन क्षेत्रात चिकूची लागवड असून सुमारे 5 हजार पेक्षा जास्त शेतकरी चिकूच उत्पादन घेत आहेत. त्यातील 147 शेतकरी अधिकृत जीआय वापरकर्ते झाल्याने या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. जीआय वापरकर्ते मेसर्स केबीबी अग्रॉ इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड, तापी (गुजरात) येथे एपीईडीएच्या सहायक व नोंदणीकृत पॅकहाऊस सुविधेतून मेसर्स केबीबी मार्फत हा चिकू युनायटेड किंग्डम येथे निर्यात करण्यात आल्याने घोलवड येथील प्रसिद्ध चिकू आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. डहाणू घोलवड परिसरातील चिकू दिल्ली, पंजाब, हरियाणा, नागपूर या भागात मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यानंतर येथील चिकूला इतर देशातही मोठी मागणी आहे. दुबई, कुवैत या देशात मोठी मागणी आहे. मात्र नुकताच येथील चिकूला युनायटेड किंग्डम येथून देखील मागणी आल्याने चिकू बागायतदार समाधान व्यक्त करत आहेत.
चिकूला मिळणार चांगला बाजार भाव-
घोलवड येथील चिकू प्रसिद्ध असून या जीआय मानांकनामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. पर जिल्ह्यातील चिकू घोलवडचा चिकू म्हणून बाजारात विकला जात असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना हवा तो भाव मिळत नव्हता. मात्र आता जीआय मानांकनामुळे येथील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. घोलवडचा प्रसिद्ध चिकू टिकवायचा असेल, तर त्याला मार्केट व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेत काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या सहकार्याने घोलवडच्या चिकूसाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आली, त्यामुळे येथील चिकू बागायदाराना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -#Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...