पालघर - जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसण्याच्या घटना अद्यापही सुरुच आहेत. डहाणू तालुक्यातील नागझरी, वसावलापाडा येथे सकाळी ०१:०३:१५ वाजताच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. आयएमडीच्या नोंदीनुसार याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. या घटनेत डहाणू तालुक्यातील नागझरी येथे भूकंपामुळे घर अंगावर कोसळून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाडपर्यंत जोरदार धक्के बसल्याने पाऊस सुरू असतानाही या परिसरातील सर्व नागरिक घराबाहेर पडले. तर काहींनी रात्र घराबाहेर रस्त्यावर जागून काढली. सदर घटनेत नागझरी, वसावलापाडा ता. डहाणू येथील रिष्या मेघवाले (वय ५५) यांचा घर अंगावर कोसळल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
पालघर जिल्ह्यातील भूकंपात घर कोसळल्याने एकाचा मृत्यू मागील काही महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत आहेत. याच वर्षी 24 जानेवारीला सकाळी 9.13 आणि 9.15 वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के बसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रतेनुसार नोंद
बुधवारी रात्री जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात गुरुवारी पहाटे आज 1 वाजताच्या सुमारास एका मागून एक असे भूकंपाचे चार भूकंपाचे धक्के बसले आहेत. पहिला भूकंपाचा धक्का 1.03 वाजता 3.8 रिश्टर स्केल, 1.15 वाजता 3.6 रिश्टर स्केल तसेच 2.9 ,2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे असे चार भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे सध्या नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.