पालघर - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न सरकार समोर उभा राहिला. अखेर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. सध्या त्यावर अंमल सुरू असून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचा फटका अतिदुर्गम, ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना बसल्याचे पाहायला मिळले. नेटवर्क प्रॉब्लेम, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईलची किंमत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या मोखाडा, जव्हार भागातील विद्यार्थ्यापुढे गंभीर प्रश्न उभा राहिला. मात्र यावर दिगंत स्वराज फाउंडेशनने अनोखी उपाय शोधला आहे.
मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड म्हटलं, की समोर येत ते अतिदुर्गम भागातील दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणासाठी कोणताही वाव नसलेल्या या भागात दिगंत स्वराज फाउंडेशनने येथील विद्यार्थ्यांना 'बोलकी शाळा' या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मोखाडा तालुक्यातील नीळमाती दांडवळ व आसपासच्या गाव पाड्यात ही बोलकी शाळा सुरू करण्यात आली असून याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला आहे.मोखाडा तालुक्यातील निळमाती दांडवळ या अतिदुर्गम भागात अनेक कुटुंब अशिक्षित असल्याने ते शेतकामासाठी मजूर म्हणून जातात. मात्र शाळा बंद असल्याने मुले दिवसभर गावाबाहेर माळरानात खेळण्यास किंवा रानावनात भटकंती करायची. आता बोलकी शाळा सुरू झाल्याने या गावातील विद्यार्थी एकाच ठिकाणी येऊन स्पीकरच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.
मोखाडा तालुक्यातील नीळमाती दांडवळ व आसपासच्या गाव पाड्यात बोलकी शाळा सुरू करण्यात आली आहे. बोलकी शाळा ही गावातीलच आजूबाजूच्या घरांच्या व्हरांड्यावर भरत असून प्रत्येक व्हरांड्यावर 5 ते 15 विद्यार्थी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियम व अटींचे पाळून बसतात. व्हॉईस ओव्हरच्या आधारे 'स्पीकर दादा' किंवा 'स्पीकर ताई' म्हणून पूर्व- रेकॉर्ड केलेले धडे या बोलक्या शाळेत स्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून विद्यार्थीही आवडीने हजेरी लावतात. रेकॉर्ड केलेल्या कविता, धडे, गोष्टी, पाढे बोलताना विद्यार्थी याचा मनमुराद आनंद लुटत शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दिगंत स्वराज फाउंडेशनने हे पाऊल उचलले असून यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थीही सांगतात. याचे समाधान या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकताना दिसत आहे.बोलकी शाळा या संकल्पनेद्वारे दिवाळीपर्यंत शालेय अभ्यासक्रमापैकी किमान 20 टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बोलकी शाळा सुरू झाल्याने या गावातील विद्यार्थी एकाच ठिकाणी येऊन स्पीकरच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. विद्यार्थ्यांचे वयानुसार तीन गटात विभागण्यात आले असून गट 1 मध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थी, गट 2 मध्ये 7 ते 9 वर्ष वयोगटातील आणि गट 3 मध्ये 10 ते 13 वर्षे वयोगटातील आहेत. हे विद्यार्थी दररोज तासन-तास या शैक्षणिक सत्रास हजेरी लावतात. बोलकी शाळा सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रविवारीही दररोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वर्ग घेण्यात येतात.बोलकी शाळा सध्या या भागातील जवळपास 300 विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी या भागातील टोकन पॉईंट बनली आहे. प्रदेशातील 20 आदिवासी गावांमधील 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे दिगंत स्वराज फाउंडेशनचे लक्ष आहे. टाळेबंदीत ग्रामीण आणि सुविधा नसलेल्या भागासाठी पर्याय म्हणून बोलकी शाळा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. मात्र शासन स्तरावर या संकल्पनेची दखल घेऊन दिगंत स्वराज फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांना पाठबळ देऊन ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचेल याचा विचार होणे आवश्यक आहे.