पालघर- मासेमारी व पापलेट उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील गत हंगामातील पापलेट उत्पादनामध्ये 190 टन इतकी घट झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात डोलनेट जाळ्याद्वारे काही मच्छीमार, पापलेटच्या लहान पिल्लांची मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. तसेच मासेमारी बंदी कालावधीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात मासळीचा तुटवडा? पालघरच्या सातपाटीतील हंगामी पापलेट उत्पादनात घट सातपाटी येथील पापलेट (सरंगा) मासेमारी प्रसिद्ध असून येथील पापलेट अमेरिका, जपान, चीन तसेच जगभर मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. सातपाटी येथे 'सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड' आणि 'सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित' या 2 मच्छिमार संस्था कार्यरत आहेत. सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेअंतर्गत 135 बोटी तर सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या सुमारे 75 बोटी पापलेटची मासेमारी करतात.
पापलेटचा दर व विगतवारी माशाच्या वजनावर ठरवला जात असून 500 ग्रामहुन अधिक वजनाच्या माशाला सुपर सरंगा म्हटले जाते. या दोन्ही सहकारी सोसायटी मार्फत मासेमारी हंगामाच्या आरंभी पापलेट विक्रीचे दर निश्चित केले जातात. हे दर मासेमारी हंगाम आरंभापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत व नंतर फेब्रुवारी ते हंगाम संपेपर्यंत, अशा पद्धतीने निश्चित केले जातात.
पापलेट हा मोठ्या मागणीचा मासा गिलनेट व डोलनेट अशा, दोन पद्धतीने पकडला जातो. पापलेट हा मासा पाण्याच्या पृष्ठभागावर तिरका (तिरप्या) पद्धतीने वाहत असतो. त्याला 5 ते 6 इंच इतका, आस असलेल्या गिलनेट पद्धतीच्या जाळ्याने सातपाटी भागाचे मच्छीमार पकडतात. या पद्धतीत माशाचा श्वास घ्यायचा गिल (कल्ले) हा भाग जाळ्यायांमध्ये अडकला जातो, त्यामुळे पापलेटच्या अंगावरील खवले अखंड राहून माशाचा ताजेपणा कायम राहतो, असे येथील मच्छिमार सांगतात.
त्याबरोबरच लहान आकाराचे पापलेट मासे या प्रकारच्या जाळ्यातून सहजपणे निघून जात असल्याने मध्यम व मोठ्या आकाराचे मासेच या पद्धतीने पकडले जातात. सातपाटी येथील सर्वोदय व मच्छीमार संस्थाच्या पापलेट मासेमारी उत्पादनाची आकडेवारी पाहता सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सन 2018-19 या कालावधीत पकडल्या गेलेल्या पापलेट माशांच्या उत्पादनामध्ये 190 टन इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे.
एप्रिल व मे महिन्यात समुद्रात पापलेट व अन्य मासे पिलांना जन्म देतात. मात्र, या लहान पिल्लांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी बंदीच्या काळात बॉटम ट्रॉलिंग व डोलनेट पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून मासेमारी केली जात असून अनेक कमी आकारांच्या पापलेट पिल्लांची (कावलटी) बाजारांमध्ये विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे. त्यामुळे 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी 90 दिवसांचा करण्यात यावा, तसेच मच्छिमार बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील मच्छिमार सहकारी संस्थांनी केली आहे.
पापलेटचे वर्षनिहाय उत्पादन - वर्ष | सर्वोदय सह.संस्था | मच्छीमार सह.संस्था | एकूण |
२०१४-१५ | ३,१३,८६९ | १६९१०१ | ४८२९४० |
२०१५-१६ | ९३,२७७ | ६५४५४ | १५८७३१ |
२०१६-१७ | १,९९,७५१ | ९२९१० | २९२६६१ |
२०१७-१८ | ३,३५,१२८ | १६,१९८८ | ४९७११६ |
२०१८-१९ | २,०४,३१३ | ८८६०४ | २९२९१७ |