पालघर -वसईत आनंदी माने या महिलेने रागाच्या भरात आपल्या सुनेच्या डोक्यात फ्लावरपॉट मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया माने, असे मृत महिलेचे नाव आहे. वसई पश्चिम येथील इस्कॉन इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीने स्वत:च माणिकपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
आनंदी माने यांचा मुलगा रोहन कामानिमित्त अमेरिकेला असतो. सहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न रियासोबत झाले होते. त्यांना सहा महिन्यांची एक मुलगीदेखील आहे. पंधरा दिवसांपूर्वीच ते अमेरिकेहून भारतात परत आले होते. आनंदी हिला सुन रिया आवडत नव्हती. मुलाला आपल्यापासून दूर करत असल्याचे म्हणत तिचे सतत रियासोबत भांडण व्हायचे. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते.