पालघर - ज्यांना जेलमध्ये जायची घाई झाली आहे, त्यांच्यासाठी कोठड्या रिकाम्या आहेत. लवकरच त्यांनाही जेल मध्ये टाकू असे म्हणत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. तसेच गल्लीतल्या नेत्यांना गल्लीत ठेवा आणि महायुतीच्या राजेंद्र गावित यांना दिल्लीत पाठवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी विरारमधील मनवेलपाडा येथे महायुतीची विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्र्यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका वसई-विरारमधील बांधकाम व्यावसायिकांकडून फंड घेतला जातो. हा फंड झोलझाल फंड आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, नागरिकांना झोल-झाल टॅक्स द्यावा लागतो. ज्या लोकांनी याठिकाणी झोल-झाल केला आहे. त्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल. ज्यांनी झोल केला आहे, त्यांची पोलखोल करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
आमच्या विरोधात 56 पक्ष एकत्र आले आहेत. ही 56 पक्षांची आघाडी म्हणजे महाखिचडी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप हा देशप्रेमींचा पक्ष आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेना वेगळे लढले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आले आहेत. ते एकत्र आल्यानंतर जंगलातील कितीही लांडगे आणि कोल्हे एकत्र आले तरीदेखील ते लढाई जिंकू शकत नाहीत. त्यामुळे आता ही लढाई वाघ आणि सिंहच जिंकणार आहेत. त्यामुळे 'शिट्टी गुल झाली आहे' असे म्हणत, बहुजन विकास आघाडीला न मिळालेल्या शिट्टी या चिन्हबाबत बविआ व विरोधकांची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली.