पालघर- उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथून हरवलेल्या एका चिमुकल्याच्या आई-वडिलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. 29 जून रोजी आपले मूळगाव रामपूर, जिल्हा फैजाबाद येथून हरवलेल्या संदीप कुमार 7 वर्षीय चिमुकल्याला पालघर रेल्वे पोलिसांनी सुखरूप त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केले.
उत्तर प्रदेशातील हरवलेल्या चिमुकल्याला रेल्वे पोलिसांनी आई-वडिलांकडे केले सुपूर्त डहाणू रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर 1 जुलै रोजी सात वर्षाचा चिमुकला रेल्वे पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकात आजूबाजूला त्याचे पालक व नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, यात पोलिसांना कोणीही मिळून आले नाही. त्यानंतर या मुलाला पालघर रेल्वे पोलिसांकडे आणण्यात आले. तेथे विचारणा केली असता, हा चिमुकला भाषेच्या अडचणीमुळे फक्त आपले नाव 'संदीप' आणि 'रामपूर' इतकेच बोलत होता. त्यानंतर पोलिसांनी या चिमुकल्याला 2 जुलै रोजी बाल कल्याण समिती पालघर समोर हजर केले असता, समितीने बालकांची काळजी व संरक्षण करणाऱ्या गिरी वनवासी प्रगती मंडळ निरीक्षण गृह, धुंदलवाडी ता. डहाणू येथे संगोपनार्थ पाठविण्याचे आदेश दिले.
गिरी वनवासी प्रगती मंडळाचे अधिक्षक वाळवी यांनी स्थानिक दुभाषिककडून भोजपुरी भाषेत चिमुकल्याकडून त्याच्या घरचा पत्ता व आई-वाडीलांबाबत विचारणा केली असता फैजाबाद हे नाव समोर आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली तसेच बाल कल्याण समिती फैजबाद येथेही संपर्क केला. त्यानंतर बाल कल्याण समिती मार्फत स्थानिकांशी संपर्क साधून पोलिसांनी या चिमुकल्याच्या पालकांचा शोध लावला व त्यांना आपला मुलगा पालघर येथे सुखरूप असल्याचे कळवले. पालक व मुलगा यांची ओळख पटल्यानंतर बालकल्याण समिती पालघर यासमोर हजर करत पोलिसांनी चिमुकल्याला सुखरुप आईवडिलांकडे सुपूर्द केले.
संदीप हा आईसोबत शेतात गेला असता हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी उत्तरप्रदेश-फैजाबाद येथील मवई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुंबईला जाऊन आपल्याला काम मिळेल असे सांगत त्याच्यापेक्षा एक थोरला मुलगा व संदीप हे दोघेजण रेल्वेने जाण्यासाठी बसले. मात्र, रेल्वेचा प्रवास त्यांच्यासाठी अज्ञात असल्याने त्यांची दिशाभूल झाली व 1 जून रोजी संदीप डहाणू रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना मिळून आला.
या मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पालघर रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मोरे, राहुल मराठे, योगिता वायकर, मेहेर, होमगार्ड सुरज बाबर व केदार कदम यांनी मोलाची कामगिरी बजावली.