पालघर (वसई)- अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र, रविवारी (दि. 16 मे) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठे मोठ्या लाटां व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीच्या भागात येत्या दोन चार दिवसात तौक्ते चक्रीवादळ येण्याचा इशारा देण्यात आला होता. या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे वसईतील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या बोटी शनिवारी (दि.15मे) समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या.
रविवारी (दि. 16 मे) मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठं मोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात झाली होती. या लाटांचा व वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटून गेले. या बोटी किनाऱ्यावर जोराने आदळून गेल्याने बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही एकदिवसीय मासेमारीसाठी जाणाऱ्याबोटीही अक्षरशः तुटून त्यांचे दोन तुकडे झाले आहेत.तर काही बोटी एकमेकांवर खडकावर आदळून गेल्याने बोटींना मोठे मोठी छिद्र पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही बोटींचे इंजिनही निखळून पडले आहे.