पालघर- लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास लक्षद्वीप बेटाच्या वायव्य दिशेला २०० किमी दूर या वादळाचा केंद्रबिंदू होता. 'वायू' चक्रीवादळ मुंबईपासून साधारणतः ८४० किमी दूरवरुन नैऋत्य दिशेने जाणार आहे. तसेच हे वादळ गुजरातपासून १०२० कि.मी दुरून जाणार आहे. त्याची तीव्रता पुढील १२ तासांत वाढणार असून ते वायव्य दिशेला वळणार असल्याचे भाकित वर्तविले गेले आहे.
'वायू' चक्रीवादळाचा राज्यात धडकण्याचा धोका कमी असला तरीही त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढू शकतो. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल व या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.