पालघर- आदिवासी एकता परिषदेचे 27 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन 13 ते 15 जानेवारी दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच जनसमूहाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी व विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून 'आदिवासीत्व' या केंद्रबिंदू मधून या सांस्कृतिक वा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात देशातील विविध भागातून एक लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होण्याची शक्यता असून या संमेलनाची तयारी सुरू आहे. आदिवासी हे खरे मूळ निवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालय मान्य करत असताना देशातील आदिवासींच्या अस्तित्वावर सतत हल्ले होत आहेत. आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीवरील अधिकार नाकारले जात आहेत. 5 व्या तसेच 6 व्या अनुसूची अंतर्गत त्याचप्रमाणे पेसा कायद्याने दिलेले ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे सर्रास उल्लंघन होत आहे. आदिवासी जनसमूहाच्या निसर्गपूजक परंपरा नाकारून त्यांच्यावर सांस्कृतिक आक्रमण तीव्र केले जात आहे. आदिवासीवर इतर धर्म, अंधश्रद्धा लादले जात असल्याने आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे.
पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या विनाश नीतीच्या केंद्रस्थानी असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे एमएमआरडीए विकास आराखडा, सागरी महामार्ग आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी हद्दपार करण्याचे प्रयत्न होत आहेत. संपूर्ण देशात अशा अविनाश मी तिच्या विरोधात आदिवासी एकता परिषद संघर्ष करीत असून पालघर जिल्ह्यातही भूमिसेना, आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम धोदडे यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे.