विरारमध्ये मद्यधुंद चालकाची पोलीस व्हॅनसह इतर वाहनांना धडक, चालक पसार - विरार ताज्या बातम्या
एका मद्यपी चारचाकी वाहन चालकाने विरारमध्ये एका पोलीस गाडीसह चार मोटार सायकलीला धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहन चालक पळून गेला आहे. याचा तपास विरार पोलीस तपास करत आहेत.
विरार (पालघर) - विरार मध्ये रविवारी (दि. 2 ऑगस्ट) दुपारी एका अज्ञात वाहनाने पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली आहे. यात पोलिसांच्या गाडीसह इतर चार मोटार सायकलीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्व येथील साईनाथ परिसरात एका चारचाकी वाहनाने (एम एच 47 ए 5897) विरार स्थानकाकडून महामार्गाच्या दिशेने जात असताना अचानक साईनाथ परिसरात या गाडीने प्रथम विरारच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. नंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर वाहनांना धडक देत पोबारा केला. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला असता पुढे काही अंतरावर चालक गाडी सोडून पळून गेला. स्थानिकांनी माहिती दिली की चालक दारूच्या नशेत होता. या अपघातात पोलीस वाहनासह चार मोटार सायकलीचे मोठे नुकसान झाले आहेत. सदराची घटना ही सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून आरोपी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.