उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी गावात घरावर 'तिरंगा' झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादात गावाच्या पोलीस पाटलांना तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली. विठ्ठल घोडके असे मारहाण झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. त्यांना अमोल बबन घोडकेसह इतर ५ जणांनी लोंखडी सळई तसेच दगडांनी जबर मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल घोडके याने त्यांच्या राहत्या घरावर 'तिरंगी' झेंडा (राष्ट्रध्वज) लावला होता. सोसाट्याच्या वारा सुटल्यामुळे तो राष्ट्रध्वज खाली पडला. त्यानंतर त्याने पुन्हा राष्ट्रध्वज घरावर लावला. यानंतर विठ्ठल घोडके यांनी पोलीस पाटील या नात्याने अमोलला सांगण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रध्वज खाली पडून त्याचा अवमान होत आहे. त्यामुळे त्याचा अवमान होऊ नये म्हणून राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक घरात काढून ठेव, राष्ट्रध्वज घरावर लावू नकोस, असे सांगितले.