उस्मानाबाद- जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पलटवार केला आहे. ढवळे यांना जो न्याय मिळायला हवा तो न्याय पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ओमराजेंना न्याय मिळावा, अशी त्यांनी मागणी केली. युतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त घेण्यात आलेल्या शहरातील प्रचारसभेत ते बोलत होते. ढवळे व इतर शेतकऱ्यांची मातोश्री येथे भेट झाली नसल्याबद्दल ठाकरेंनी सभेत जाहीर माफीही मागितली.
दोन दिवसांपूर्वी दिलीप ढवळे यांनी शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्या केली होती. शेतकरी दिलीप ढवळे यांनी चिठ्ठीत उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याची खंतही व्यक्त केली होती. हा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही माझी आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची इच्छा आहे.
युती केल्याने शरद पवारांच्या पोटात गोळा येतो- उद्धव ठाकरे
मी शब्द फिरवले असल्याची टीका शरद पवार वारंवार करत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी मी हा युतीचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्या पोटात गोळा येत असल्याची त्यांनी टीका केली. राज्यघटनेतील देशद्रोहाचे कलम रद्द करणे, शरद पवार यांना मान्य आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार हे महाराष्ट्राबरोबर निष्ठेने राहिले नाहीत. तसे राहिले असते तर महाराष्ट्राने शरद पवारांना डोक्यावर घेतले असते, असा टोला त्यांना लगावला.