उस्मानाबाद- एसटी महामंडळाने वयोवृद्ध लोकांसाठी आणि बोगस ज्येष्ठ नागरिकांमुळे एसटी महामंडळावर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी स्मार्ट कार्ड वाटपाचे काम हाती घेतले आहे. मात्र, स्मार्टकार्ड देताना महामंडळाकडून आधार, कार्ड, मतदान, ओळखपत्र, दोन फोटो या कागदपत्रांसह ५० रुपयांच्या स्मार्ट कार्डसाठी दोनशे रुपये आकारले जात असून प्रवाशांची लूट सुरू आहे.
स्मार्टकार्ड देताना महामंडळाकडून ५० रुपयांच्या स्मार्ट कार्डसाठी दोनशे रुपये आकारले जात असून प्रवाशांची लूट सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना अल्प दरात प्रवास करता यावा यासाठी त्यांचे वय ६० वर्ष असणे गरजेचे असते. या प्रवासासाठी पूर्वी आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राचा वापर केला जात होता. मात्र, आता महामंडळाने यात बदल केले असून स्मार्ट कार्ड देऊन ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी सवलत उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्मार्ट कार्ड वाटपाचे काम मंडळाने हाती घेतले आहे. महामंडळाकडून काम करताना सर्वर बंद पडणे, वाढलेली गर्दी आणि माणसांची कमतरता यामुळे स्मार्ट कार्डचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे.
खाजगी कंपनीने हेच काम जिल्ह्यातील चार ऑनलाईन सेंटर चालकांना दिले आहे. या चालकांनी ७० रुपात स्मार्ट कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मात्र, हे सेंटर चालक २०० रुपये घेऊन स्मार्ट कार्ड नोंदणी करत प्रवाशांची लूट करत आहेत.
महामंडळातील अधिकाऱ्यांचा कॅमेरॅसमोर बोलण्यास नकार
याप्रकरणी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कॅमेरॅसमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, ईटीव्ही भारतला महामंडळातील कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार स्मार्ट कार्ड ऑनलाईन करण्यासाठी ट्रायमॅक्स या कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनी कडून जिल्ह्यातील चार ऑनलाइन सेंटर चालकांना हे काम दिले आहे. मात्र, याची कुठलीही माहिती अद्याप एसटी महामंडळाकडे उपलब्ध नाही. हे ऑनलाइन सेंटर चालक किती दर घेऊन प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड ऑनलाइन करणार आहेत. तसेच ते सेंटर चालक कुठले आहेत या संदर्भातील कुठलीही माहिती तसेच नियम व अटी (अग्रीमेंट) एसटी महामंडळाकडे उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.
महामंडळाच्या परिसरातच लूट
महामंडळाचे स्मार्ट कार्ड ऑनलाइन करण्यासाठीचे केंद्र ज्या परिसरात आहे, तेथूनच वीस फुटाच्या अंतरावर एसटी महामंडळाच्या परिसरात माऊली इंटरप्राईजेस या नावाचे ऑनलाइन सेंटर सुरू आहे. या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑनलाइन सेंटर चालकाकडून ज्येष्ठ नागरिकांची लूट होत आहे. स्मार्ट कार्ड ऑनलाईन करण्यासाठी अधिकची २०० रुपये रक्कम घेऊन ज्येष्ठ नागरिकांची लूट सुरू आहे.