उस्मानाबाद - कोरोनाच्या सावटाखाली राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तापासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली. तुळजाभवानीचे मंदिरही सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे सेलिब्रिटी आणि व्हीआयपी यांच्यासह सामान्य भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दर्शनासाठी मर्यादा -
मंदिर उघडताच परिसरामध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. दररोज फक्त 4 हजार भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची मर्यादा सकाळी सकाळीच संपत आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक होत आहे. त्यातच व्हीआयपी लोक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. आमदार आशुतोष काळे आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब व्हीआयपी कोट्यातून देवीचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी देखील व्हीआयपी दर्शनाचा मोठा घोळ समोर आला होता. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.