उस्मानाबाद -कोरोना विषाणूचा फटका तुळजाभवानी मंदिराला देखील बसला आहे. त्यामुळे, कोरोनाचा धोका लक्षात घेत तुळजाभवानी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचे मंदिर बंद सर्व धार्मिक व सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या(मंगळवार) पहाटे ५ वाजल्यापासून ते ३१ मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर बंद होण्याची घटना ही आहे. यासोबतच, भाविकांनी प्रत्यक्ष मंदिरात न येता वेबसाईटवर जाऊन लाईव्ह दर्शन घ्यावे अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा -उस्मानाबाद : हळद लागण्यापूर्वीच मोहिनीचा दुर्दैवी मृत्यू
तुळजापुरला देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. दररोज साधारणत: १५ ते २० हजारापर्यंत भाविक येऊन दर्शन घेत असतात. यात कळसाचे दर्शन घेणाऱया भक्तांची नोंद नाही. मात्र, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी ३५ हजारापर्यंत भक्तांची गर्दी असते. शिवाय राज्यासह लगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. गर्दीमुळे कोरोना विषाणू पसरण्याचा धोका लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -पुण्यातून धूम ठोकलेले कोरोना संशयित कुटुंब अद्याप बेपत्ता