उस्मानाबाद- काही प्रमाणात कमी झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या शनिवारी आलेल्या अहवालात वाढली आहे. यात बाधित शिक्षकांची संख्या चिंताजनक आहे. राज्य सरकारने येत्या काही दिवसांत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
शनिवारी प्राप्त अहवालानुसार उस्मानाबाद शहरातील व उमरगा शहरातील एका शाळेत सर्वाधिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कुलमध्ये जवळपास 20 शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर उमरगा येथील महात्मा बसवेश्वर शाळेतील 6 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यातील इतर शाळेतील कोरोनाबाधित शिक्षकांची संख्यादेखील वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात 87 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश पॉझिटिव्ह सापडलेल्या शिक्षकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
जिल्ह्यात बाधित रुग्णांची आकडेवारी
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित रुग्णाची संख्या - 15442
जिल्ह्यातील बरे होऊन घरी गेलेल्या रुग्ण संख्या - 14618
जिह्यात सध्या उपचार घेत असलेली रुग्ण संख्या- 266
जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या - 558
२३ नोव्हेंबरपासून उघडणार शाळा
कोरोनाच्या पाश्वभूमीवर 22 मार्चला राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुन्हा हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी शाळांनी तयारी सुरू केली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याचे दररोज तपासणी
शाळा सुरू झाल्यानंतर दररोज विद्यार्थ्यांची तपासणी, सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही सोशल डिस्टन्सिंगमध्ये वर्गात बसविण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला काही त्रास असेल, तर त्याला शाळेत बसवण्यात येणार नाही.
प्रशासनाची जबाबदारी वाढली
पालकांपेक्षा प्रशासनाची जबाबदारी जास्त वाढली आहे. शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी या प्रत्येकाची जबाबदारी घेऊन शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार महाविद्यालय प्रशासन काम करणार आहे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. अध्यापन साहित्य, डेस्क, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तूंची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरातील सर्व कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हँडवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शक्य असल्यास हँड सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.
शाळा उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर
राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र शाळा सुरू करण्याची घेतलेली आठमूठी भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई, ठाणे महापालिकेने आपल्या क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करू शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असून भविष्यात शाळा सुरू करताना स्थानिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक