उस्मानाबाद -राज्यासह जिल्ह्यातही राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी त्यांनी 'परिवर्तन गरजेचे आहे' असे म्हणत शहरभर पोस्टर लावले होते. पाटील यांनी 'परिवार संवाद' सभेचे आयोजन केले होते. याला शिवसेनेचा विरोध असून शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांनी "गाढव असणारा घोंगडे पांघरून वाघाच्या कळपात शिरत असेल तर ही जनता गाढवाला गाढवच आहेस हे दाखवून देईल" असा सल्ला भाजपला दिला आहे.
सावंत म्हणाले, "मित्रपक्ष म्हणून तुम्हाला सल्ला देतोय शेवटी तुमचं घोंगडं तुमच्या गळ्यात. जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागा शिवसेनाच लढवणार आहे. या जागा आम्ही सोडणार नाही आणि एकही जागा खाली जाऊ देणार नाही. आमचे ठरले आहे 2014 ची पुनरावृत्ती होणार नाही. सजग आहोत हे आम्ही दाखवून देऊ"