उस्मानाबाद - जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण अभाव असल्यामुळे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी व पालकांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा
उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराजवळ 60 एकरची जागा आहे. या जागेत विद्यापीठ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
उस्मानाबाद सारख्या अतिमागास जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. काही विद्यार्थ्यांना बौद्धिक गुणवत्ता असताना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणाची आवड असताना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. युवक उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित होत आहेत. शहराकडे जाणारा हा समुदाय थांबविण्यासाठी व्यावसायिक, व्यवस्थापन, विज्ञान आणि कृषी शाखेतील आधुनिक अभ्यासक्रम नव्या विद्यापीठात सुरू करण्यासाठी उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय औरंगाबाद येथे असल्यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसत आहे.उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराजवळ 60 एकरची जागा आहे. या जागेत विद्यापीठ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.