उस्मानाबाद - आस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्याची आधीच दयनीय अवस्था झाली आहे. यात आता एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात दुसऱ्याच्या शेतात आलेले चांगले पीक नष्ट करण्यापर्यंत अनेकांची मजल जात आहे. जिल्ह्यातील अनसुर्डा येथील शहाजी गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात व्यक्तीने कोथिंबिरीच्या पिकावर तणनाशक फवारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कोथिंबिरीच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
शहाजी गायकवाड यांची विठ्ठलवाडी या शिवारात जमीन आहे. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रामध्ये कष्टाने कोथिंबिरीची लागवड केली होती. कोथिंबीरचे पीक चांगले बहरले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने या कोथिंबीरवर तणनाशक फवारून सर्व कोथिंबिरीच्या पिकाचे नुकसान केले आहे. तणनाशक फवारल्याने कोथिंबीर आता पूर्णपणे वाळत आहे.