उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांनी 13 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात बरे झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चांगली असली तरी कोरोनामुक्त रुग्णांच्या त्रासात इतर आजारांची भरच पडली आहे. सध्या या रुग्णांना वेगवेगळ्या इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबात 'ईटीव्ही भारत'ने कोरोनामुक्त होवून बऱ्या झालेल्या रुग्णांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती घेतली आहे.
शहरातील सतीश (नाव बदललेले आहे) यांना 5 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. साधारणपणे नऊ दिवसांनी सतीश यांना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले. दीड लाख रुपये खर्च करून आणि योग्य उपचार घेतल्यानंतरही सतीश यांना अजूनही शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत. पॉझिटिव्ह होऊन महिना ओलांडला आहे तरीही थकवा जाणवतो, वारंवार धाप लागते, थोडेसे अंतर चालले की पाय दुखतात, श्वास घेताना अडकल्या सारखे वाटते व तापही येतो असल्याचे सतीश म्हणाले.